लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना वेगवेळ्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या आहेत. याशिवाय तालुकास्तरावर दररोज सायंकाळी सात वाजता तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांची कोविड संदर्भात बैठक घेऊन सूक्ष्म कृती नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालये याची जबाबदारी, बेड मॅनेजमेंटची जबाबदारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्याकडे दिली आहे. त्याचबरोबर गंभीर रुग्ण, व्हेंटिलेटरवरील रुग्ण व अतिदक्षता विभागीतल रुग्णबाबतचे दैनंदिन अहवाल, कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे दैनंदिन आढवा, नियंत्रण, डाटा अपडेशनबाबत तालुकास्तरीय टीम कार्यान्वित करणे, कंटेन्मेंट झोन, कॉन्टेक्ट ट्रेसिंगचा अहवाल, कोविड पोर्टलवर सर्व रुग्णांबाबतच्या नोंदी अद्यायावत करणे, लसीकरण केंद्रे कार्यान्वित करणे आदी जबाबदारी निश्चित केली आहे.