पिंपरी: घरातील दोन भावांच्या वादात झालेल्या झटापटीत टीव्ही फोडून नुकसान केले. त्यांनतर आईलाही शिवीगाळ केली. याप्रकरणी तरुणाच्या भावासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी सेनेटरी चाळीत १४ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
अविनाश काशिनाथ काळे (वय २७, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे. विकी सतीश ठोकळ (वय ३०), शंकर काशिनाथ काळे (वय ३४), अशोक जनार्दन साठे (वय ३५, सर्व रा. सेनेटरी चाळ, पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर काळे हा अविनाश काळे यांचा मोठा भाऊ आहे. अविनाश हे १४ एप्रिलला त्यांच्या राहत्या घरात असताना आरोपी विकी ठोकळ त्यांच्या घरी आला. पळून लावलेल्या नातेवाईक मुलीला आणून दे, नाहीतर बघ, असे तो म्हणाला. मुलीला पळवून लावले नसल्याचे काळे यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने आरडाओरड करून त्याने काळेंना शिवीगाळ केली. त्यानंतर शंकर काळे व अशोक साठे देखील तेथे आले. त्यांनीही अविनाश काळे यांना शिवीगाळ केली. तेव्हा घरातील दोन टीव्ही फोडून नुकसानही केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हाताला मार लागला. पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेतले. या घटनेमुळे फिर्यादी घाबरून गेले होते. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नाही. परंतु आरोपींनी रविवारी (दि. १८) काळे यांच्या आईला शिवीगाळ केली म्हणून पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करत आहेत.