कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील असणाऱ्या कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आठवडेबाजार एक महिन्यात हटविला नाही तर आठवडेबाजारच बंद करण्याबाबत प्रशासनाला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सूचना दिल्या असून हा आठवडेबाजार स्मशानभूमी परिसरात स्थलांतरित करणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी औद्योगिक कारखानदारांनी मुख्यमंत्र्याना साकडे घातल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना वाहतूककोंडी सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून महामार्गावरील अतिक्रमण काढण्याबरोबरच वाहतूककोंडीस कारणीभूत असणारे बेकायदा रस्ता दुभाजक व अवजड वाहतूक ठराविक काळासाठी बंद करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र वाहतूककोंडी सुटण्यात अपयश आल्यानंतर वाघोली येथील रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस यंत्रणेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत श्री. राव यांनी कोरेगाव भीमा येथील महामार्गालगत असणाऱ्या एसटी महामंडळाच्या जागेत असणारा आठवडेबाजार व रोज बसणारे भाजी विक्रेते हटविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याने बाजार तत्काळ स्थलांतरित करून त्यानुसार कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत.’’
कोरेगाव भीमा येथील बाजार होणार स्थलांतरित
By admin | Published: February 20, 2016 1:01 AM