पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी राबविण्यात आलेल्या मतदारनोंदणी अभियानात नावे स्थलांतरित करण्याच्या अर्जांची संख्याही अधिक आहे. स्थलांतरासाठी गठ्ठ्याने येणाऱ्या अर्जांची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली असून, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यावर आक्षेप घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील मतदार नोंदणी व निवडणूक अधिकारी यांच्याकडे त्याविषयीची तक्रार करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे इच्छुकांना मिनी विधानसभा मतदार संघाला सामोरे जावे लागणार आहे. नव्या प्रभागरचनेत पूर्वीच्या प्रभागांतील हक्काच्या मतदारांचा काही भाग वगळला गेला आहे. तर काही प्रभागांचा भाग नव्याने समाविष्ट झाला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकांना धक्का बसला आहे, तर काहींना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या हक्काचा मतदार नवीन प्रभागात स्थरांतरीत अर्जाद्वारे परत आणण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. इच्छुकांकडून मतदारांच्या प्रभाग बदलाचे आठ ‘अ’चे अर्ज सरसकट व गठ्ठयाने दाखल केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. पत्ता बदल करण्यासाठी दाखल झालेल्या आठ अ च्या अर्जांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती दाखले यांनी मतदारनोंदणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)आठ ‘अ’ अर्जाचे गूढ...मतदार स्थलांतरित झाला असेल, संबंधितांना आठ ‘अ’चा अर्ज करून नव्या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविधा आहे. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उठविताना दिसत आहेत. नवीन प्रभाग रचनेत आपल्या हक्काचा मतदार दुस-या प्रभागात गेला आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी हा मतदार परत मिळविण्यासाठी आठ ‘अ’चे अर्ज गठ्ठयाने दाखल करण्यास सुरवात केली आहे.
राजकीय लाभासाठी स्थलांतर
By admin | Published: October 23, 2016 3:47 AM