पुणे : धार्मिक भावना तसेच जातीय दंगल भडकविण्याच्या उद्देशाने भाषण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणात समस्त हिंदू आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अंतिम अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला.
यापूर्वी याप्रकरणात अंतरिम जामीन मंजुर झाला होता. जामीन मिळावा यासाठी अॅड. एस. के. जैन व अॅड. अमोल डांगे यांमार्फत न्यायालयात अर्ज करण्यात आला. पुराव्यात हस्तक्षेप करू नये तसेच तपासास सहकार्य करण्याच्या अटींवर 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला.
कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकबोटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पुणे शहरात असणारा मुस्लिम बहुल भाग म्हणून कोंढवा ओळखला जातो. याठिकाणी हज हाऊस बांधण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु या हाऊसला एकबोटे यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मिलिंद एकबोटे यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. यामुळे दंगल होण्याची शक्यता आहे. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..................