पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज (दि. २३) शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले. शिक्रापूर पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत.
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेशुक्रवारी दुपारी स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाले. सर्वोच्च न्यालयालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलीस त्यांची चौकशी करू शकणार असतील तरी अटक करू शकणार नाहीत.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याचबरोबर आतापर्यंत एकबोटे यांना अटक का केली नाही, अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज एकबोटे स्वत:हून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी त्यांची चौकशी केली. आता एकबोटे स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या एकबोटेंना अटक केली तरी कोर्टाच्या आदेशामुळे लगेचच व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळू शकतो.