पुणे : प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायालयाने सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत किंवा या आदेशापासून पुढील साठ दिवस दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत किंवा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी; तपास यंत्रणांना सहकार्य करावे व पुराव्यात छेडछाड करू नये, या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. याच गुन्ह्यात गेल्या आठवड्यात कालिचरण उर्फ अभिजित धनंजय सराग याला जामीन देण्यात आला होता.
समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानावर ' शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जातीय तेढ निर्माण होईल, अशी प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण, मिलिंद रमाकांत एकबोटे, मोहन शेटे, दीपक बाबूलाल नागपुरे यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकबोटे बंधू, नागपुरे व शेटे यांनी अॅड. एस. के. जैन व अॅड. अमोल डांगे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे.