पुणे : समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी त्यांच्या वकीलांमार्फेत आयोगाला शुक्रवारी लेखी अर्ज सादर करुन साक्षीकरिता गैरहजर राहण्याची मागणी केली आहे. आयोगाने सदर अर्ज मान्य केल्याची माहिती आयोगाचे वकील अशिष सातपुते यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सदस्य माजी मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांचे समोर १० जानेवारी रोजी एकबोटे यांची साक्ष नोंदवली जाणार होती. एकबोटे यांनी आयोगाला सादर केलेल्या अर्जात सांगितले, एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली.या घटनेच्या अनुषंगाने माझे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केले. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आपल्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आणि अटक झाली. मात्र, चौकशी दरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत. पुणे न्यायालयाने याप्रकरणात मला जामीन मंजूर केलेला असून अद्याप यासंर्दभातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले नाही. एल्गार परिषदेचे आयोजक यांनी डाव्या संघटनेच्या मदतीने तसेच नक्षलवादी संघटना यांचे द्वारे जाणीवपूर्वक एक ते तीन जानेवारी २०१८ दरम्यान कोरेगाव भीमा, वढू व राज्यात आंदोलन पेटवले. आतापर्यंत या केसचा तपास पोलीस पारदर्शकपणे करत होते व त्यांनी नक्षलवादी संबंध उघडकीस आणल्याचे एकबोटे यांनी अर्जात म्हटले आहे.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:04 PM
चौकशी दरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत.
ठळक मुद्दे १० जानेवारी रोजी एकबोटे यांची साक्ष नोंदवली जाणार होती.