निनाद देशमुख
पुणे: युद्ध जिंकण्यासाठी, शत्रुला हरवण्यासाठी विजेच्या वेगाने हल्ला करणे महत्त्वाचे असते; मात्र हे करणे सोपे नसते. यात काही निसर्गाचे तर काही मानव निर्मित अडथळे असतात. वाटेत येणाऱ्या नदी, नाले पार करण्यासाठी कृत्रिम पुलांची आवश्यकता असते. तर शत्रूने पेरलेले भूसुरुंग निकामी करण्यासाठी आधुनिक यंत्राची गरज असते. यासाठी लष्करात अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारतीय लष्करासाठी अभियंते तयार करण्यासाठी पुण्यात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ज्यांना लष्करात करिअर करायचे आहे, अशा तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.
लष्कराचे विविध विभाग असतात. लष्करी अभियांत्रिकी विभाग हा त्यातील एक भाग आहे. जवानांना मदत करण्यासाठी हा विभाग चोख कार्य बजावत असतो. सीमावर्ती भागात वेगाने रस्ते तयार करणे, पूल बांधणे, कृत्रिम पुलांची उभारणी करणे, लष्करांच्या वाहनांची देखरेख ठेवणे यासोबतच नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे या अभियंत्याचे काम असते. साधारणत: मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ही लष्कराच्या इतर विभागाप्रमाणेच कठीण आणि आव्हानात्मक असते.
साधारणत: वर्षात दोन वेळा या विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही होत असते. या संदर्भातील नोटीफिकेशन ही लष्कराच्या जॉईन मिलटरी सर्व्हिसेह या वेबसाईटवर जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यात निघते. अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १२ वी परीक्षेत ७० टक्के असणे अनिवार्य आहे. यासाेबतच जेईई ही परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उपलब्ध जागांनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यानंतर निवड केलेल्या मुलांना एसएसबी मुलाखतीची तयारी करावी लागते. लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातून पास होणारे अभियंत्यांना लष्करात अधिकारी पदाचा दर्जा मिळतो. सुरुवातीला कॅप्टन आणि लष्करात सेवा केल्यानंतर अनुभव आणि सेवा कालावधीनुसार त्यांना पदोन्नतीही मिळत असते.
एसएसबी मुलाखत ही महत्त्वाची पायरी असते. यामुळे याची चांगली तयारी करणे गरजेचे असते. एसएसबी मुलाखत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. साधारणत: ३ ते ४ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना लष्करी अभियांत्रिकी सेवेत विविध विभागात सामावून घेतले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमटेक आणि एमई आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीही मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यासाठी त्यांना अभ्यासक्रम रजाही मिळत असते.
लष्करी अभियांत्रिकी सेवा ही एक मानाची सेवा आहे. या क्षेत्रात तरुणांना करिअर करण्याची एक चांगली संधी आहे. सक्षम अभियंते हे लष्कराला आणखी बळकट करीत असतात. जिद्द, चिकाटी आणि ध्यास या त्रीसूत्रीचा वापर केल्यास यात नक्कीच यश मिळते. तर चला तयारीला लागुयात.