- रविकिरण सासवडेबारामती : सातत्याने दुधाचे दर उतरत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या २७ रुपये दराला सहकारी दूध संघांनीदेखील ६ रुपयांची कात्री लावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूधपावडर व बटरचे दर उतरल्याने त्याचा परिणाम दूध दरावर झाला असल्याचे सहकारी दूध संघाकडून सांगण्यात येत आहे. दुग्धव्यवसायाला संजीवनी द्यायची असेल तर दूध उत्पादक शेतकºयाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान शासनाने सुरू करावे, अशी मागणीही सहकारी दूध संघाकडून होत आहे.सध्या ३.५ फॅट, २९.५ डिग्री आणि ८.५ एसएनएफ गुणवत्ता असणाºया दुधाला २१ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. ज्या दुधामध्ये अशी गुणवत्ता अढळत नाही, त्या दुधाला २१ रुपयांपेक्षा कमी दर मिळत आहे. मध्यंतरी झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर शासनाने शासकीय दूध खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ केली होती. त्यानुसार २७ रुपयांवर तो दर गेला होता. प्रत्यक्षात तत्पूर्वीच सहकारी संस्थांनी गाईच्या दुधाला २७, तर म्हशीच्या दुधाला ३३ रुपयांपर्यंत दर दिला. बहुतेक खासगी दूध संस्था या राजकीय व्यक्तींच्या मालकीच्या आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासगी दूध संस्थांनी अचानक दूध दरवाढ केली. मात्र, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा खासगी दूध संस्थांचे दर अस्थिर राहिले.खासगी दूध संकलन संस्थांवर नियंत्रण नाहीखासगी दूध संकलन संस्थांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे दूधदर सातत्याने अस्थिर राहतात. शासनाने सुमारे महिनाभरापूर्वी शासकीय दरापेक्षा कमी दर देणाºया सहकारी दूध संघांना नोटिसा काढल्या होत्या. परंतु खासगी दूध संकलन संस्थांच्या विरोधात ब्रदेखील काढला नाही. खासगी पशुखाद्य कारखानेदेखील आहेत. उचलीच्या नावावर हे पशुखाद्य दूध उत्पादक सभासदांच्या माथी मारले जाते. पशुखाद्याच्या दर्जाचीदेखील तपासणी केली जात नाही. खासगी दूध संस्था अतिरिक्त दुधाच्या काळात दर कमालीचे खाली आणतात. परिणामी सहकारी दूध संघाकडेदेखील अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रतिलिटर ५ रुपये अनुदान शासनाने जमा करावे, अशी मागणी सहकारी दूध संघांनी केली आहे.बारामती तालुका सहकारी दूध संघ दूध उत्पादकाला २१ रुपये दर देत आहे. जमा होणारे दूध बारामती संघ दूध पावडर व बटरनिर्मिती करणाºया खासगी उद्योगांना देत असतो. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर नीचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे खासगी उद्योगांनी दुधाचे खरेदी दर कमी केले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकºयांना कमी दराचा फटका बसला आहे. - संदीप जगताप,अध्यक्ष, बारामती सहकारी दूध संघदर तीन ते चार वर्षांनी साधारण अशी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत शासनाने दूध उत्पादकांना वाºयावर न सोडता, मदत करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत शासनाने मदत केली आहे. त्यामुळे राज्यशासनाने ४ ते ५ रूपये अनुदान तर केंद्रशासनाने दूधपावडरला अनुदान देणे गरजेचे आहे.- वैशाली नागवडे,महानंदच्या माजी अध्यक्षा
दूधदराला सहकारी संघाकडूनही कात्री! आंतरराष्ट्रीय बाजारात दूधपावडर, बटरचे दर पडल्याने परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:14 AM