पुणे : दूध डेअरी व्यावसायिकाने उधारीचे पैसे न दिल्याने दोन जणांनी कोयत्याने 17 वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाळासाहेब पाटील ( वय 37 वर्ष ) असे हत्या करण्यात आलेल्या दूध व्यावसायिकाचे नाव आहे. नर्हे-कात्रज रस्त्यावर मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे. बाळासाहेब पाटीलला दारू पाजून त्याच्यावर कोयत्याने डोक्यात 17 वार करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुणाल रणदिवे व सागर गिरी असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
पाटील यांचा दूध डेअरीचा व्यवसाय होत तर कुणाल रणदिवेचा पनीर व दुग्धजन्य पदार्थांचे दुकान आहे. पाटील यांनी कुणालकडून उधारीवर पैसे घेतले होते. मात्र ते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे कुणाल आणि सागरने पाटील यांना दारू पाजली. त्यानंतर नर्हे-कात्रज रोडवरील शहीद कर्नल प्रकाश पेट्रोल पंपाजवळ नेऊन त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यात पाटील यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.