अंकुश जगताप, पिंपरीउन्हाची वाढलेली दाहकता आता दुग्ध व्यावसायिकांना जेरीस आणू लागली आहे. उकाड्यामुळे दूध नासण्याचे प्रकार वाढू लागल्याने गवळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या दिवसांत जनावरांची काळजी घेण्यासह दूध टिकविण्याच्या उपाययोजना करण्याचे आवाहन ताथवडे येथील पशुवैद्यकीय अधिकारी करीत आहेत. मागील ४ दिवसांतच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. रविवारी ३८ अंशांवर असणारे कमाल तापमान सोमवारी ४० अंशांवर पोहोचले आहे. उन्हाचा परिणाम दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मावळ, मुळशी तालुक्यांतील बहुतांश शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. अनेक शेतकरी ५ ते १० जनावरे पाळतात. त्यांचे दूध पिंपरी-चिंचवड, पुण्यात विकून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र सध्या उन्हामुळे उद्भवलेल्या स्थितीतून व उकाड्यामुळे हे दूध ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नासून खराब होत आहे. बहुतेक व्यावसायिक ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्याकडे शीतकरण सुविधा नसते. त्यामुळे सायंकाळी धार काढल्यानंतर दूध बादलीत अथवा पातेल्यामध्ये भरून ठेवले जाते. सकाळी उठल्यावर भांड्यातील सर्वच दूध खराब झाल्याचे वा त्याला आंबट वास येत असल्याचा प्रत्यय येत आहे. विशेषत: सकाळी दूध तापविताना महिलांना ही बाब चटकन लक्षात येत आहे. परिणामी गवळ्याच्या हातात पैसे मिळेनासे झाले आहे. उलटपक्षी आपले नेहमीचे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी दूधभट्टीवरून इतर गवळ्यांकडून दूध विकत घ्यावे लागत आहे. सध्या वीस लिटर दूध विकत घेण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे तोटाच सहन करावा लागत असल्याचे गवळ्यांनी सांगितले. गाई-म्हशींना उन्हामुळे निर्जलीकरण, उन्हाचे चटके बसून आजारी पडण्याचे प्रकार होण्याचा धोका वाढला आहे. ताथवडे येथील वळूमाता प्रक्षेत्राचे व्यवस्थापक डॉ. अनिल देशपांडे यांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. दुधाची करा जपणूकधार काढताना वापरले जाणारे भांडे, जनावराची कास चांगल्या प्रकारे धुवावी. जेणेकरून दुधाला जंतुसंसर्ग होणार नाही. शक्यतो दूध फ्रिजमध्ये ठेवावे. गावी हे शक्य नसल्यास दूध बादलीमध्ये ठेवून ती मोकळ्या हवेत व ओले फडके गुंडाळून ठेवावी. शक्यतो दूध रात्रीच तापवावे. गवळ्यांनी दूध विक्रीस नेताना ओल्या फडक्याने घागर, कॅन झाकावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडावे.
गवळ्या घरी दूध लागले नासायला
By admin | Published: April 22, 2015 5:36 AM