लासुर्णे : खासगी दूध संकलन संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. गेल्या चार महिन्यात दुधाचे दर प्रतिलिटर २४ रुपये दरावरून १५ रुपये केले आहेत. तब्बल ९ रुपयांनी झालेल्या घसरणीमुळे दूध उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. या खासगी दूध उत्पादक संस्थांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी वाढत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु एकीकडे जनावरांसाठी ओला चारा टिकवण्याची कसरत तर दुसरीकडे खासगी दूध संस्थांनी पाडलेले दर या कात्रीत दूध उत्पादक सापडला आहे. त्यात पशुखाद्यांचे दरही वाढले आहेत.विहिरींनी तळ गाठला आहे. चारापिके वाचवण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहे. त्यात दर कमी केल्याने उत्पादकांमध्ये हतबलता दिसून येत आहे. पशुखाद्याच्या दरात प्रतिगोणी पन्नास रुपये कमी करावेत अशी मागणी शेतकरी व दूध उत्पादकांकडून होत आहे.दूधाचे मिळणारे पैैसे व होणारा खर्च यातून हातात काहीच उरत नाही. चारा पुरत नसल्याने तो विकत घ्यावा लागतो. कडवळसाठी १ हजार २00 रूपये गूंठा, मकवाणसाठी हजार रूपये गूंठा तर उसासाठी अडीच हजार रूपये गूंठा मोजावे लागतात. ऐवढा महागडा चारा देवूनही दर मिळत नाही. लाखभर रूपये देवून घेतलेली गाई कशी परवडाणार असा सवाल लासुर्णे येथील शेतकरी सचीन थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. (वार्ताहर)हातात शेणखतदिवसात एका गाईच्या १८ लिटर दुधामागे १६४ रु. तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे एका गाईला एका वेळी दोन ते अडीच किलो पशुखाद्य दिले जाते. दिवसात एका गाईला दोन वेळेला पाच किलो पशुखाद्याचे १७ रुपये प्रमाणे ८५ रुपये होतात. त्याचप्रमाणे गाईला दिवसाला १३ ते १५ किलो हिरवा चारा लागतो. हा सर्व खर्च वजा करता दूध उत्पादकाच्या हातात शेणखतदेखील राहात नाही. त्यामुळे मिळणारा आर्थिक फायदा दूरच राहतो. या गंभीर बाबीची दखल घेऊन राज्य शासनाने हा प्रश्न मार्गी लावावा व दूध उत्पादकाला न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील दूध उत्पादक करीत आहेत.
दूध उत्पादक संकटात
By admin | Published: May 11, 2015 6:06 AM