मंचर: पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत बायपास रस्त्यावर दुधाच्या टँकरने सकाळी पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकरमधील दुधानेच तरुणांनी आग विझवली आहे.
कळंब जवळील पुणे नाशिक महामार्ग नवीन बायपास जवळ दुधाच्या टँकरने चालक दामोदर क्षीरसागर संगमनेरला जात होता. केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून सदर गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. मदतीसाठी समोर शेतात काम करणारे देवराम कानडे व त्यांचा मुलगा तेजस कानडे यांच्याकडे बादल्यांची मागणी केली. सुदैवाने तरुणांनी मदत केल्यामुळे आग डिझेल टाकीपर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुधाच्या टँकरचे संपूर्ण केबिन पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
सदर दुधाचा टँकर हा नारायणगावच्या दिशेने जात असताना हॉटेल इंद्राच्या विरूद्ध दिशेने जाताना शेतकरी देवराम विठ्ठल कानडे यांच्या शेतासमोरच टॅंकरने पेट घेतला होता. सदर घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांना कमलजादेवी सार्वजनिक गणेश मंडळाचे उपाध्यक्ष तेजस कानडे यांनी दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले.पोलीस संतोष मांडवे,संपत काळभोर आणि होमगार्ड अभिषेक कवडे दाखल झाले होते. घटनास्थळी आग विझवण्या कामी सामाजिक कार्यकर्ते हर्षल भालेराव, शिवसेना युवा समन्वयक रोहन कानडे, सागर कानडे, विकास कानडे, देवराम कानडे ,अंकुश शेवाळे ,संतोष कोंडावळे, अभिजीत थोरात, विलास काळे यांच्यासह स्थानिक तरुणांनी मदत केली. टँकरला लागलेली आग विझवण्यासाठी तेजस कानडे यांनी दिलेल्या बादल्यांच्या साह्याने दुधाच्या टँकरमधून पाईपच्या साह्याने दूध काढून दूधानेच तरुणांनी आग विझवली. त्यानंतर जवळपास एक तासांनी जुन्नर नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला होता. त्यांनी धूमसणारी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शिवाय चालकाने प्रसंगवधान राखून वाहन रस्त्याच्या बाजूला घेतल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.आग डिझेलच्या टॅंकपर्यंत पोहोचली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असे स्थानिकांनी सांगितले.