गिरणी कामगार, पत्रकार ते लोकसभा उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत पुण्यातील मोहन जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:45 AM2019-04-02T01:45:48+5:302019-04-02T07:14:57+5:30
मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून सन 1971 पासून ते पक्षात सक्रीय आहेत. कुटुंबातील हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला.
पुणे - काँग्रेसने पुण्यातील लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. पुण्यातील उमेदवारीबाबत काँग्रेस हायकमांडने अचानक वेगळ्याच उमेदवाराला तिकीट देऊन राजकीय बॉम्ब टाकल्याचं दिसून येतं. कारण, केवळ पक्षश्रेष्ठींच्या चर्चेत असणारेच नाव निश्चित करण्यात आले आहे. तर, माध्यमात आणि जनसामन्यात चर्चेत असलेल्या सुरेखा पुणेकर, प्रविण गायकवाड आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, गेल्या 40 वर्षांपासून काँग्रसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या दादांनाच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.
मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून सन 1971 पासून ते पक्षात सक्रीय आहेत. कुटुंबातील हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यामुळे मिलमध्ये कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. तसेच एका मराठी वर्तमान पत्रासाठी श्रमिक पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पत्रकार म्हणून काम करत असताना सामाजिक आणि राजकीय बातमीदारीमध्ये त्यांचा अधिक कल होता. त्यातूनच, सर्वसामान्यांचे प्रश्नाला वाचा फोडण्यात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपला पेन चालवला. यातूनच समाजात आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव झळकू लागले. लहानपणीपासून काँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात सक्रीय होऊन कामाला सुरुवात केली. सन 1972-73 मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा झेंडा आपल्या हातात घेतला. आपल्या कामाची चुनूक दाखवल्याने लवकरच त्यांना पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले.
पुणे युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाचं काम करताना, वरिष्ठ नेत्यांवरही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सन 1997 ते 2004 या कालावधीतील निवडणुकांमध्ये पुण्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. याच काळात काँग्रेसने महापालिकेतही स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. सन 1999 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोहन जोशी यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपाचे प्रदीप रावत विजयी झाले होते. मात्र, 2,12,000 मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. तरीही, 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. विशेष म्हणजे 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. पण, मोहन जोशी यांना उमेदवारी नाकारली. मोहन जोशींऐवजी सुरेश कलमाडींना 2004 मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. तरीही, पक्षक्षेष्ठींचा आदेश मान्य करुन नाराज जोशींनी पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम केले.
काँग्रेस तुमच्या दारी या संकल्पनेतून त्यांनी पुण्यात खऱ्या अर्थाने काम केले. गोरगरीब जनतेचे प्रश्न, झोपडपट्टी आणि कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला.
मोहन जोशी यांची 2005 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली होती.
काँग्रेस कार्यकारणीच्या सदस्यपदी 2009 पासून निवड करण्यात आली होती.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोहन जोशी यांची आखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निरीक्षकपदी निवड केली होती.
काँग्रेसचे 40 वर्षांहून अधिक काळ सदस्य
पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान सदस्य
सुरुवातीपासून इच्छुकांच्या यादीत नाव
माजी विधान परिषद सदस्य
2008 मध्ये विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड
2010 विधान परिषदेच्या आश्वासन समितीवर निवड
2012-14 विधान परिषदेच्या आश्वासन समितीवर फेरनिवड