मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:05 IST2024-12-16T09:05:50+5:302024-12-16T09:05:50+5:30
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे.

मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पाटील यांचा जन्म मुंबईमध्ये सर्वसामान्य घरात झाला. त्यांचे आई-वडील मिल कामगार होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून पाटील यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली हाेती. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे.
सन २०१४ मधील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सार्वजनिक उपक्रम वगळता) कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती. आता फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सन २०१९ ते २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्यावर होती. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून पाटील यांची निवड झाली. २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा त्यांची आमदार म्हणून निवड झाली. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून पाटील यांची निवड झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता, महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर पाटील यांनी काम केले. १९९५-१९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह पाटील यांनी काम केले आहे.