पुणे : शहरात वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्यांच्या कडेला तसेच रस्त्यांच्या मधोमध असलेल्या मॅनहोलच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला कोट्यवधीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. रस्त्यांची उंची आणि मॅनहोलची उंची समपातळीवर आणण्यासाठी पथ विभागाला प्रति मॅनहोल २० हजार रुपयांचा खर्च करावा लागणार असल्याची बाब समोर आली आहे. अशी तातडीची दुरुस्ती आवश्यक असलेले तब्बल ९१० मॅनहोल शहरात असून, त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.हा निधी पथ विभागाकडे शिल्लक नसल्याने या दुरुस्तीसाठीचा निधी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात राखून ठेवण्याचा प्रस्ताव पथ विभागाकडून प्रशासनासमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रस्ते तयार करणारा पथ विभाग आणि मॅनहोल उभारणाऱ्या डे्रनेज तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजात वेळीच समन्वय साधला असता, तर या खर्चाचा भुर्दंड प्रशासनाला टाळता येणे शक्य होते. दीड महिन्यापूर्वी धनकवडी येथील तीन हत्ती चौकात महापालिकेच्या खराब झालेल्या मॅनहोलमुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील अशा रस्त्याच्या पातळीच्या खाली गेलेल्या मॅनहोलचे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात तब्बल ९१० धोकादायक पद्धतीची मॅनहोल आढळून आली होती. त्यानंतर थोड्या स्वरूपात दुरुस्त्या करणे शक्य असलेल्या मॅनहोलची दुरुस्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, या मॅनहोलची उंची विटांनी वाढविली असली, तरी वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहनांच्या वजनाने तसेच हे काम केल्यानंतर त्यास पुरेसा वेळ न दिल्याने या मॅनहोलची झाकणे पुन्हा खचली आहेत. त्यामुळे या मॅनहोलच्या दुरुस्तीसाठी कायमचा तोडगा काढण्याकरिता प्रशासनाकडून विशिष्ट पद्धतीने दुरुस्त केली जाणार आहेत. त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शहरातील रस्त्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेला तब्बल दडी लाख मॅनहोल असल्याची माहिती प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात शहरातील मुख्य रस्त्यांवर सुमारे २,२०० किलोमीटर लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या असून, त्यावर तब्बल १ लाख १० हजार मॅनहोल आहेत. तर, जवळपास ६१ किमी लांबीच्या पावसाळी वाहिन्या असून, त्यावर सुमरो २४ हजार ६०० मॅनहोल आहेत. तर एमएनजीएल, महावितरण तसेच विविध आॅप्टिकल कंपन्यांच्या फायबर केबलच्या तांतिक दुरुस्तीसाठी ठराविक अंतरावर टाकलेली जवळपास २० हजारांहून अधिक युटिलिटी मॅनहोल आहेत.रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आली मॅनहोल प्रशासनाच्या अहवालानुसार, शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेली मॅनहोल रस्तारुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेली आहेत. शहराच्या जुन्या हद्दीत रस्ता जेवढा ताब्यात आला त्यानुसार सेवा वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्या रस्त्याच्या बाजूला होत्या. मात्र, त्यानंतर विकास आराखड्यानुसार, रस्त्यांचे रुंदीकरण दोन्ही बाजूंनी करण्यात आल्यानंतर ही मॅनहोल आता रस्त्यांच्या मधोमध आली आहेत. तर, या रस्त्यांवर दर तीन वर्षांनी डांबरी थर चढविला जात असल्याने मॅनहोलची उंची आणि रस्त्याच्या उंचीत तीन ते पाच इंचांपर्यंत फरक पडत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मॅनहोलमध्ये कोट्यवधींच्या निधीचा निचरा
By admin | Published: January 07, 2016 1:48 AM