पिंपरी : ऑनलाईन गेममुळे एका झटक्यात करोडपती झालेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. ऑनलाइन गेममध्ये दीड कोटी रुपये जिंकल्यानंतर गणवेशात मुलाखत देणे त्यांना भोवले आहे.
ऑनलाइन गेमच्या माध्यमातून करोडपती झालेले सोमनाथ झेंडे हे चाकण पोलिस ठाणे येथे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा दाखल केला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली होती. झेंडे यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.
दरम्यान, झेंडे यांची नियुक्ती साईड ब्रँच असलेल्या आरसीपी (दंगा नियंत्रण पथक) येथे झाली. या पथकाकडून १० ऑक्टोबर रोजी उर्से टोल नाका येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यावेळी पथकात असलेल्या झेंडे हे ऑनड्युटी असताना त्यांना ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागल्याचे समजले. झेंडे सोशल मीडियात व्हायरल झाले. गणवेश परिधान करून त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली.
गृहमंत्र्यांकडे तक्रार
ऑनड्युटी असलेल्या झेंडे यांना बक्षीस लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर झेंडे व्हायरल झाले. त्यावरून झेंडे यांच्यावर आरोप देखील झाले. झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे अमोल थोरात यांनी केली. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निवेदन दिले.
झेंडे यांच्यावर आरोप झाल्याने तसेच गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याने याबाबत पोलिस उपायुक्तांकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. ऑनलाइन गेममध्ये बक्षीस जिंकल्याबाबत गणवेशात मुलाखत दिली. यातून पोलिसांबद्दल चुकीचा संदेश गेला, असा ठपका ठेवण्यात आला.
प्राथमिक चौकशीनुसार पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना निलंबित केले आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर विभागीय चौकशी करणार आहेत.- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी