पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन जवळपास ५८ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालक डॉ. स्नेहा जोगळेकर आणि वरुण जोगळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खडकवासला येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२० पासून सुरु होता.
फिर्यादी यांनी एका जाहिरातीवरुन डॉ. स्नेहा जाेगळेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी घरीच हाॅलमध्ये तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना वेगवेगळ्या पदासाठी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. काही जणांना हॉटेलमध्ये हाऊस किपिंग तर काहींना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कामासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावतो, असे अमिष दाखविले.
फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले पण नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरीता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.
एकामागोमाग थापा अन आश्वासनावर ठेवले झुलत
डॉ. जोगळेकर हिने सर्वांना ११ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यातील २ लाख रुपये दिल्यावर व्हिसा मिळेल. त्यानंतर पुढील ४ लाख दिल्यानंतर तिकीट देऊ असे सांगितले होते. उरलेले ५ लाख तुमच्या पगारातून कापून घेतले जातील, असे सांगून या तरुणांचा विश्वास संपादन केला. त्यांना मॅरीटाईम क्रू चा व्हिसा पाठविला. त्याची या तरुणांनी चौकशी केली.
तेव्हा तो फक्त सी पोर्टवर कामासाठीचा होता. नोकरीसाठी नव्हता. त्यानंतर जोगळेकर हिने आमची तिकडे कंपनी आहे. ती तुमची सर्व राहणे, जेवण, वाहतूक याची सोय करणार असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊन असतानाही वंदेभारतम सेवेतून तुम्हाला पाठविणार असल्याचे सांगितले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया सरकारचा जी आर दाखवून त्यांचे विमान रद्द झाल्याचे सांगून फसवणूक केली. त्यानंतर त्यांना दरवेळी पुढचे वायदे करुन झुलवत ठेवले.