पिंपरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची बचत होत आहे. पाण्याचा पुर्नवापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून साठविलेल्या पाण्यामुळे शहरात पाणी टंचाई कमी जाणवत आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात केवळ २४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. औद्योगिक नगरीच्या परिसरात नवीन होणाऱ्या बांधकामांना राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प बंधनकारक केला आहे. त्यानुसार महापालिकेने एप्रिल २००५पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, अनेक महापालिकांचे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष आहे. महापालिकेने या योजनेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पावसाळ्यात गृहप्रकल्पांच्या छतावर पडणारे पाण्याची साठवणूक करणे. त्याचा पुर्नवापर करणे. तसेच, पाण्याचे जमिनीत पुर्नभरण करणा-या प्रकल्पांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रोत्साहन म्हणून मिळकत करात १० टक्के सूटही देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात शहरातील नऊशे प्रकल्पांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे लाखो लीटरपाण्याची बचत झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लाखो लिटर पाण्याची बचत
By admin | Published: May 13, 2016 1:00 AM