पुणे : दुचाकीवरून जाताना रस्त्यात पडलेली एक लाखाचा ऐवज असलेली बॅग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तरुणीला पोलिसांनी परत मिळवून दिली.
मानसी अतुल ढमाले (रा. तळेगाव) औंध रस्त्यावरून पुणे शहराकडे जात असताना दुचाकीला अडकवलेली बॅग पडली. त्यामध्ये ५० हजार रुपये रोख, स्मार्ट फोन व इतर वस्तू असा एक लाख रुपयांचा ऐवज होता.
विद्यापीठ चौक पार केल्यावर बॅग पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हरवलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
ढमाले या चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार अमोल जगताप यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बॅग चौकात पडल्याचे लक्षात आले. जगताप यांनी हरवलेल्या मोबाईलवर फोन लावला असता, सांगवी येथील जितेंद्र गोपसुरवे यांनी फोन उचलला व बॅग घेऊन येत असल्याचे सांगितले. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी बसवराज माळी यांना सांगून दोन्ही व्यक्तींना बोलवून एकमेकांविरुद्ध कोणाची तक्रार नसल्याने, हरवलेला लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग ढमाले यांना परत मिळाली. बॅग परत आणून दिल्याबद्दल गोपसुरवे व तपास केल्याबद्दल जगताप यांचे बसवराज माळी यांनी कौतुक केले.
फोटो - (सीसीटीव्ही या नावाने आहे.)