खेडशिवापूर (पुणे): कासुर्डी याठिकाणी एलिगझर सोलटेक या कार केअरचे मटेरियल बनवणाऱ्या कंपनीस शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
पोलीस प्रशासन व महसूल खात्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये चारचाकी वाहनांच्यासाठी लागणारे कलर स्प्रे व चारचाकी वाहनांना पॉलिशसाठी लागणाऱ्या वस्तू बनवल्या जात होत्या. दुपारी कंपनीमध्ये काम चालू असताना एका विभागात अचानकपणे आग लागली. सर्वत्र ज्वलनशील पदार्थ व रसायने असल्याने लागलीच त्या रसायनांनी पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले.
कामावर असलेल्या 30 ते 40 कामगारांनी लागलीच कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने जीवितहानी झाली नाही. आगीची तीव्रता एवढी होती की यामध्ये कंपनी परीसरात पार्क केलेल्या आठ दुचाकी वाहनेही यामध्ये जळून खाक झाली.
आगीची माहिती समजताच बघ्यांची कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसरात बंदोबस्त लावून स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या स्थानिक पाण्याचे टँकर व अग्नीशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.