पुणे : भारत संचार निगम लिमिटेडमधील (बीएसएनएल) अधिकारी बोलतोय, असे सांगत सीमकार्ड वापराची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरट्याने एका महिलेच्या बँक खात्यातून १० लाख ८५ हजारांची रोकड लांबवली.
याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बीएसएनएलचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. चोरट्याने समाजमाध्यमातून महिलेला संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील डीपीवर चोरट्याने बीएसएनएलचे बोधचिन्ह ठेवले होते. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. मोबाइल सीमकार्डची मुदत संपलेली आहे. सीमकार्ड वापराबाबतची माहिती अद्ययावत करावी लागेल. माहिती अद्ययावत न केल्यास सीमकार्ड बंद पडेल, अशी बतावणी चोरट्याने महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्याने महिलेचा डेबिट कार्ड तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. महिलेचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आलेला होता. महिलेने दिलेल्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून चोरट्याने महिलेच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने १० लाख ८५ हजार रुपये लांबविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड तपास करत आहेत.
चौकट
सायबर चोरट्यांकडून सीमकार्ड, बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.