लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो काढून ते पती व सासरी दाखविण्यासाठी धमकी देऊन एका दाम्पत्याने महिलेला लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी दाम्पत्यापैकी पतीला अटक केली आहे. गणेश जगन्नाथ सोनावणे (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार २०१२ ते २०१९ या कालावधीत घडला.
याप्रकरणी वारजे येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. सोनावणेची पत्नी तिच्याकडे कपडे शिवायला देत त्यातून फिर्यादी व आरोपी यांची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन गणेश सोनावणे याने पीएमसी कॉलनीतील घरी फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्या वेळी फोटो काढून ते तिच्या पती व सासरी दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तिच्याकडून ६ तोळ्यांचे दागिने तसेच ५ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून ती रक्कम स्वत:साठी वापरली. त्याच्या पत्नीने साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा हार घेऊन त्याचा अपहार केला. हे दागिने परत देण्याची मागणी केल्यावर त्यांनी शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून शेवटी महिलेने पोलिसांत धाव घेतली.