पुणे : सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. मात्र, आता सामान्यांकडूनही छोट्या मोठ्या दुकानदार व व्यावसायिकांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. पैसे पाठिवल्याचा व्हॉटसॲपवरील बनावट पेटीएम मेसेज दाखवून एकाने पेट्रोलपंपचालकाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी आनंद गुलाब जवारे (वय ४५, रा. गुलटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सरबजीत अरजीत सिंग होरा (रा. ईशा एम्पायर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने फिर्यादी यांना बनावट लेटर पॅडवर क्रेडिटवर डिझेल देण्यासंदर्भात विनंती पत्र लिहून देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सिक्युरिटी करीता तिऱ्हाईत महिलेचा चेक दिला. २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत आरोपीने त्याच्या गाडीमध्ये फिर्यादीच्या पंपावरुन ३४ हजार ६५१ रुपयांचे डिझेल भरुन घेतले. फिर्यादी यांनी डिझेलचे पैसे मागितल्यावर आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे व्हॉटसअँपवर पेटीएमद्वारे पैसे पाठविल्याबाबत बनावट स्क्रिन शॉट पाठवून पैसे न देता फसवणूक केली.
अशाच प्रकारे छोट्या व्यावसायिकांची अनेकदा फसवणूक होते. पैसे पाठविल्याचे सांगितले जाते. नेटचा प्रॉब्लेम असल्याचे सांगून पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज दाखविला जातो. व्यावसायिक तो खरा मानतात. प्रत्यक्षात त्यांना पैसे मिळत नाही. हा फसवणूकीचा नवा फंडा वाढत चालला आहे.