स्वामी गोविंददेव गिरी महाराज : रास्ता पेठेत भगवान महेश चौक नामकरण सोहळा
पुणे : मागील वर्षापासून प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये बसून आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोविडच्या काळात आपल्याला अनेक चांगल्या सवयीही लागल्या आहेत. परंतु तरीही आजच्या या संकटकाळात मनाचे सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. त्याकरिता छोट्या कार्यक्रमांमधून विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे आहे, असे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
समस्त माहेश्वरी समाज, पुणे आणि श्री महेश भजनी मंडळ, बिबवेवाडीतर्फे रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाजवळील ताराचंद रामनाथ हॉस्पिटलजवळील चौकाचा भगवान महेश चौक नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका मंगला मंत्री, ताराचंद रामनाथ हॉस्पिटलचे विश्वस्त गोपाळ राठी, गोविंद मुंदडा, अतुल लाहोटी, संतोष लढ्ढा, अशोक राठी यांसह विविध संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते.
आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, भगवान शंकरांची आराधना, स्मरण आणि आदर्श अनुकरण करण्याकरीता साकार प्रतिमा असणे गरजेचे आहे. त्यामुळे भगवान शंकरांमधील जीवनमूल्ये आपल्या अंत:करणात जागृत होतात. माहेश्वरी समाजामध्ये दातृत्वभाव मोठ्या प्रमाणात आहे. मंदिरे, गोशाळा यांसह गरजूंना मदतीसह अनेक ठिकाणी समाजकार्यात हा समाज पुढे असतो, असेही त्यांनी सांगितले.
अशोक राठी म्हणाले, शांतता, संस्कार आणि सचोटी या त्रिसूत्रींवर माहेश्वरी समाजबांधव कार्य करतात. कोविडच्या काळात केवळ माहेश्वरी समाजापुरते नाही, तर सर्वांकरीता अन्नदान, आरोग्यसेवा देण्यात माहेश्वरी बांधव अग्रेसर होते. भगवान शंकरांची प्रतिमा व चौकाला केलेले नामकरण सर्वांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.'' विशाल धनवडे, मंगला मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. गोपाळ राठी यांनी आभार मानले. महेश नवमीनिमित्त रविवार पेठेतील श्री हरिहर मंदिर येथे पहाटे भगवान महादेवांना अभिषेक देखील करण्यात आला.