सांगवी : एकीकडे कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी शासन कडक निर्बंध लागू करत आहे.मात्र दुसरीकडे काही मोठे व्यावसायिकच अणूपालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्याचे समोर आले आहे. सांगवी ( ता.बारामती ) येथे काही अपवाद वगळता छोटे व्यावसायिकच फक्त प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत.
मात्र गावातील काही हॉटेल, किराणा दुकाने व इतर बडे व्यावसायिकच संचारबंदीचे आदेश पायदळी तुडवत आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हातावर पोट असणारे व्यावसायिक प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आपली दुकाने बंद करत आहेत. त्याचवेळी मोठे दुकानदार विनामास्क वावरतात तसेच वेळेच्या बंधनांचे पालन केले जात नाही. कुणाच्या पाठिंब्यावर बेधकपणे आपली दुकाने थाटून बसत आहेत.असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गावातील दुकानदारांवर वचक ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर सायंकाळी सहा वाजण्याच्या पुढे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून जनजागृती देखील केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने माहिती दिल्यानंतर देखील छोटे व्यावसायिक संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत आहेत.परंतू, काही मोठे व्यावसायिक आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत दुकाने सहानंतर देखील बेधडकपणे सुरू ठेवत असल्याचे रविवारी आणि सोमवारी निदर्शनास आले.
फलटण -बारामती रस्त्यावर व्यावसायिक सहा वाजल्यानंतर आपला पसारा आवरून घरी जात आहेत. मात्र, काही हॉटेल तसेच गावातील मुख्य बाजार पेठेतील बडे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत आहे. फलटण रस्त्यावरील ६ नंतरही आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. यामुळे आता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने अशा त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.