बारामती : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे अंतिमत: बारामती शहरात शनिवार (दि. ३) पासून ७ दिवस अंशत: संचारबंदीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहे. वाढणाऱ्या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेवटी प्रशासनाला निर्बंध कडक करावे लागत आहेत. नागरिकांनी देखील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती शहर व तालुक्यात कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार (दि.३) पासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरु असतील. बारामती शहर व तालुक्यात असणारे मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमिंग, स्पा, जिम हे सात दिवस बंद असतील. तसेच तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद असतील. बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या व्यावसायिक तसेच हॉटेल मधुन पार्सल सेवा सूट देण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरणासाठी नागरिकांना परवानगी असणार आहे.तर सर्व कारखाने व कार्यालय,व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. तर विवाह सोहळा व अंत्यविधी साठी शासनाच्या नियमाप्रमाणे लोक उपस्थित असतील. दहावी व बारावीच्या ठरलेल्या परीक्षा सोडुन शाळा व महाविद्यालय येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद असेल. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात जरी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंतचा आदेश असला तरी बारामती शहरात मात्र सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. तर संध्याकाळी सात ऐवजी सहा वाजताच दुकाने बंद राहणार आहे.----------------------------पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.तर शहरातील व्यापाºयांनी दुकानात गर्दी केल्यास शासनाचे नियम न पाळल्यास ते दुकान बंद करणार आहे.- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती---------------------
अंशत: संचारबंदीच्या काळात बारामती शहरात ५ पोलिस अधिकारी ५० पोलिस कर्मचारी, ४० होमगार्ड यांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. यावेळी शहरात रिक्षावर भोंगे लावून मार्गदर्शन नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड, जमावबंदी कायद्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी १ हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. - नामदेव शिंदे, पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे-----------------------------------