पुण्यात भाजपने लॅाकडाउन विरोधात आंदोलने सुरु केली आहेत. सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून हे आंदोलन केले जाते आहे. राज्या प्रमाणेच पुण्याला नियम असावेत अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. संपुर्ण शहरातील भाजपचे पदाधिकारी आपली दुकाने उघडत निषेध नोंदवणार आहेत.
सरकारने फसवणुक करुन लॅाकडाउन लावला असा आरोप भाजपने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आंदोलन करण्यात आले. पुण्यातल्या बिबवेवाडी मधील एक हार्डवेअरचे दुकान उघडून हे आंदोलन करण्यात आले.
भाजप आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या “ महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेनचा जीआर काढला. आणि राज्याच्या आदेशापेक्षा वेगळा कडक लॅाकडाउन पुण्यात लावला गेला आहे. व्यापारी आधीच नुकसान सोसत आहे. फक्त पुण्यात वेगळी नियमावली का? या व्यापाऱ्यांवर अनेक लोक अवलंबून आहेत. त्यांचा रोजगार हिरावला जातो आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत”
शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले “सरकार पुण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतंय. त्यात एकवाक्यता नाही. पुण्यात सगळीच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहराची व्यवस्था कोलमडली आहे. आरोग्य व्यवस्था सुधारणाऐवजी हे लॅाकडाउन लादतंय.यातुन हफ्ते वसुली देखील सुरु होईल. राज्यातलंच लॅाकडाउन पुण्यात असावं अशी आमची भुमिका आहे”
यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी याविरोधात कारवाई करणार असल्याची माहिती दिली.