पुणे : पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहराचे तापमान पुन्हा घसरले असून, पारा १० अंशांच्या खाली उतरला आहे. शहरात मंगळवारी (दि. १४) किमान तापमान ९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात निचांकी तापमान जळगाव येथे ७.५ अंश सेल्सिअस इतके होते. ही स्थिती बुधवारीही कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर मात्र, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थांबला आहे. मात्र, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दिवसाचे तापमान (कमाल) वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान २ ते ३ अंशांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे निरभ्र वातावरणामुळेही सूर्यकिरणे थेट जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुपारच्या उन्हाचा चटका वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३८.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर पुण्यातील कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस होते. येत्या दोन दिवसांत शहरातील तापमान ३५ ते ३६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.