लोणावळा : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत करत भाजपकडून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. मात्र याचवेळी ठाकरे सरकारमधील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी फडणवीसांना एक खुली ऑफर देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. भुजबळांनी थेट फडणवीसांना ओबीसी समाजाचे नेतृत्त्व करावं अशी ऑफर देतानाच त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन 'इम्पेरिकल डाटा' मागावा असेही स्पष्टपणे सांगितलं आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी लोणावळ्यात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार छगन भुजबळ, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे नेतेमंडळींच्या उपस्थितीत ही चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
भाजपने ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर सुरु केलेल्या चक्का जाम आंदोलनावर टीकास्त्र सोडताना भुजबळ म्हणाले, भाजपचं आजचं आंदोलन केवळ राजकारणापोटी आहे. यातून त्यांना आम्ही ओबीसींसोबत आहोत असे दाखवायचे आहे. मात्र, कोरोनामुळे घरोघरी जात इंम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य झालं नाही. आणि कोरोना संकट दूर होईपर्यंत इंम्पेरिकल डेटा जमा करणं शक्य नाही. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार व ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं.
पोलिसांची कोरोनाचे कारण देत ओबीसी चिंतन बैठकीला नोटीस लोणावळ्यात होणाऱ्या सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांनी कोरोना संसर्गाचे कारण नोटीस बजावली आहे. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही ही चिंतन बैठक होणार असं आयोजकांनी सांगितले आहे.