पुणे : ‘ई-बालभारती’च्या व्हर्च्युअल क्लासरूमविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शालेय शिक्षणमंत्र्यांना एका सातवीतील विद्यार्थिनीने ‘मंत्री महोदया, शाळेत असताना तुम्ही खेळात कधी भाग घेतला होता का?’ हा प्रश्न विचारून गुगली टाकली. त्यावर शिक्षणमंत्र्यांनीही तिचा आत्मविश्वास पाहून ‘वर्षा गायकवाडच तिकडून बोलतेय काय?’ असे वाटल्याचे सांगत तिचे कौतुक केले...अशा प्रश्नोत्तरातून शिक्षणमंत्री व विद्यार्थ्यांमधील संवादाचा ‘व्हर्चुअल क्लास’ शुक्रवारी (दि. १४) पुण्यात रंगला.निमित्त होते, महाराज्य राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या ई-बालभारती प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम व स्टुडिओच्या उदघाटनाचे. यावेळी ‘बोलकी बालभारती’ या उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी या स्टुडिओतून संवाद साधला. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील, ‘बालभारती’चे संचालक विवेक गोसावी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे आदी उपस्थित होते. तिरवंडी येथील स्नेहल जगताप या सातवीतील विद्यार्थिनीने खेळासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर गायकवाड यांनी शिक्षण घेत असताना खेळ व इतर छंदही जोपासायला हवेत, असे सांगितले. ‘मी शाळेत असताना विविध खेळांमध्ये भाग घेतला. पण दहावीनंतर अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. उच्च शिक्षणानंतर मग राजकारणात आले. पण तुम्ही खेळातही प्राविण्य मिळवा’, असा सल्ला त्यांनी दिला. ‘तुम्ही विश्रांतीच्या वेळेत काय करता?’ या नांदेड येथील सातवी शिकणाºया ऋतुजा हिच्या प्रश्नावर त्यांनी सध्या विश्रांती कमी मिळते, असे सांगत अधिकाधिक वेळ आई-वडिलांसोबत घालवत असल्याचेही नमुद केले. नेवासा येथील कार्तिक चव्हाण, रत्नागिरीतील वैदेही पवार या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल क्लासरूमवर प्रश्न विचारले. तसेच मलकापुर येथून सचिन जाधव व उरण येथील श्रध्दा पाटील या शिक्षकांनीही संवाद साधला.------------ गणिताचा तास घेणारशिक्षण हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे शिक्षक ते शिक्षणमंत्री असा प्रवास केल्याचा अभिमान वाटतो. शासन आणि शिक्षक व विद्यार्थ्यांमधील अंतर कमी करायचे आहे. चांगला शिक्षक येत नाही तोपर्यंत वर्गात गरिमा येत नाही, असे एका प्रश्नावर बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच शिक्षक म्हणून गणिताचा एक तास घेण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.----------व्हर्च्युअल क्लासरुमराज्यातील एकुण ७२५ शाळा व ३ स्टुडिओच्या माध्यमातून व्हर्च्यअल क्लासरूम हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १९० शाळांचा समावेश आहे. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आॅनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे. --------------बोलकी बालभारतीइयत्ता आठवी ते दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पाठ्यपुस्तके ऑडिओच्या माध्यमातून प्रामुख्याने अंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतील. हे साहित्य चालु शैक्षणिक वर्षात विनामूल्य तर पुढील वर्षापासून माफक दरात उपलब्ध होणार आहे. भविष्यात पहिली ते सातवीसाठीही हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
मंत्री महोदया, खेळात कधी भाग घेतला होता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 8:37 PM
शिक्षण हे माझे पहिले प्रेम
ठळक मुद्देराज्यातील विद्यार्थ्यांशी साधला संवादइयत्ता आठवी ते दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी हा उपक्रम सुरू