पुणे: भाजपा प्रणित सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येत असताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले मात्र परगावात आहेत. सुटीचा त्यांचा कार्यक्रम बराच आधी ठरल्यामुळे ते पुण्यात नसल्याचे सांगण्यात आले, मात्र ते नसताना त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.जावडेकर पुण्यातलेच आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. त्यानंतर प्रथमच ते पुणे दौऱ्यांवर येत आहेत. त्यांनी रविवारी (दि. ९) महापालिकेच्या जायका या नदीसुधार प्रकल्पासंदर्भात सर्व संबधित अधिकारी, पदाधिकारी अशी संयुक्त बैठकही आयोजित केली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता वनभवन येथे ही बैठक होईल. नवे पालकमंत्री पाटील हेही शनिवारी रात्री पुण्यात मुक्कामी येणार असून रविवारी दिवसभर पुण्यातच थांबणार आहे, त्यांचाही पालकमंत्री म्हणून हा पहिलाच दौरा असेल.असे असताना पक्षाचे शहराध्यक्ष गोगावले पुण्यात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहराचे नवनियुक्त खासदार गिरीश बापट हे दिल्लीत जाऊन दोन दिवसांपुर्वी पुण्यात आले. तीन दिवस ते मतदारसंघातील प्रमुख भागांमध्ये फिरून मतदारांचे आभार मानणार आहेत. तसा कार्यक्रमच त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे तेही उपलब्ध नाहीत. मंत्री जावडेकर व मंत्री पाटील यांच्या स्वागताचे काय करायचे असा प्रश्न भाजपाच्या शहर शाखेत त्यामुळे निर्माण झाला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच अन्य काही वरिष्ठ पदाधिकारी काम सांभाळत आहेत मात्र अध्यक्षांची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे.
'' मंत्री महोदय '' पुण्यात आणि भाजपा शहराध्यक्ष परगावात..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 8:22 PM
भाजपा प्रणित सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येत आहे..
ठळक मुद्दे नदीसुधार प्रकल्पासंदर्भात सर्व संबधित अधिकारी, पदाधिकारी अशी संयुक्त बैठकही आयोजित