बारामती : सत्तेत सहभागी होण्याआधी हेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही, अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातेवाईक बाबा महाराज खरतोडे यांनी भरणे यांच्यावर सडकून टिका केली. कळस येथे महावितरण व राज्यसरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर गुरुवारी ( दि.25) आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
खरतोडे पुढे म्हणाले, ''कळस गावातील अडीअडचणी घेऊन आम्ही वारंवार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेलो. या राज्यमंत्र्यांना लोकांचे काही देणेघेणे नाही. लोक मरतात का जगतात याचे त्यांना काही नाही. लोकांकडे लक्ष देण्यास राज्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र मस्त चालले आहे. वीज कनेक्शन जोडावे यासाठी आम्ही महावितरणचे अधिकारी सुळ यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले. मात्र ते म्हणतात वरून आदेश आला आहे, आम्ही काही करू शकत नाही. वरून आदेश म्हणजे काही स्वर्गातून आला नाही.''
''हे राज्य शेतकऱ्यांसाठी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. मात्र हे राज्य लोकशाही पद्धतीने चालत नाही. हे हुकूमशाही पद्धतीने चालणारे शासन आहे. मागील पंचवार्षिक ला यांचे राज्य होते. तेव्हा हेच राज्यमंत्री म्हणायचे आमचं सरकार निवडून द्या. आम्ही विजबिल पूर्णपणे माफ करू. मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? उसाचे पीक 18 महिन्यांची असते. द्राक्षाचे पीक बारा महिन्याचे डाळिंबाचे पीक देखील बारा महिन्याचे असते. राज्य सरकारने अध्यादेश काढला की दर तीन महिन्यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद करून लूट करायची आणि शासनाची तिजोरी भरायची, असा आरोप राज्यमंत्री भरणे यांचे नातेवाईक खरतोडे यांनी केला.''