लासुर्णे : रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात ‘टेल टू हेड’ या पद्धतीने नियोजन केले जाणार असून, या दोन्ही आवर्तनात सर्वांना पाणी मिळेल याची काळजी घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांमार्फत पाणीमाफियांवर करडी नजर राहणार आहे. पाणीचोर निदर्शनास आल्यास त्वरित संबंधित अधिकारी व पाणीमाफियांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बोलताना दिली.
जलसंपदामंत्री विजय शिवतारे हे इंदापूर तालुक्याच्या दौºयावर आले असताना, लासुर्णे (ता. इंदापूर) येथे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. या वेळी बोलताना शिवतारे यांनी ही माहिती दिली. इंदापूर तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने बागायती पट्टा असतानादेखील दृष्काळाच्या झळा जाणवणार आहेत. यासाठी इंदापूरला हक्काची दोन्ही आवर्तने देणार आहेत. या दोन्ही आवर्तनाच्या वेळी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाणी देण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या आवर्तनावेळी पाणीचोरांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. यात कामचुकार अधिकारी व पाणीचोरांची गय केली जाणार नसून, अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बारामती उपविभाग व निमगाव उपविभागामध्ये कर्मचारी संख्या अपुरी असल्याने लवकरच हाही प्रश्न लावला जाईल. सर्व शेतकºयांनी आवर्तनावेळी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. मुबलक पाणी न सोडता कमीत कमी अशावेळी, तरी ठिबक सिंचनाचा वापर करावा यामुळे पाण्याची बचत होऊन सर्वांना पाणी मिळेल. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, इंदापूर तालुकाप्रमुख संजय काळे, कन्हेरीचे सरपंच सतीश काटे, धनंजय जाचक, उद्योजक कुणाल जाचक आदी उपस्थित होते.