वाघोली (पुणे) : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबीयांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाघोली येथे सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून तत्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. तसेच, तीनही मुलांचे पालकत्त्व स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मूळचे बार्शी येथील व सध्या वाघोलीत कटकेवाडीत वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद भागवत देठे या तरुणाने बुधवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सावंत यांनी त्यांच्या पत्नी व तीन मुलांची घरी येऊन भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, आतापर्यंत अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. त्यांचे कुटुंब उघडे पडले. आज त्यांची काय अवस्था आहे हे पाहणे गरजेचे आहे. आपण दोन दिवस त्या कुटुंबीयांकडे जातो. नंतर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही. कुटुंब उघड्यावर पडते. कोणत्याही बाबींसाठी संघर्ष करत असताना धीर ठेवावा लागतो. शेवटपर्यंत लढा द्यावा लागतो. आरक्षणाचाही लढा सुरू आहे. तरुणांच्या आत्महत्येने हा प्रश्न लगेच सुटणार नाही. समाजसेवेची आवड असणाऱ्या व झगडणाऱ्या प्रसादसारख्या योद्ध्याने आत्महत्या करावी ही चांगली बाब नाही. उलट अशा संघर्ष करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला पाहिजे.
प्रसाद देठे यांच्या पत्नी व मुलांशी बोलताना मंत्री सावंत हे भावुक झाले. त्यांनाही आपले अश्रू रोखता आले नाही. त्यांनी हात जोडून अशी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये अशी पुन्हा पुन्हा विनंती केली. कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यासाठी मी प्रस्ताव ठेवला, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सावंत यांना निवेदन देण्यात आले. तसेच देठे कुटुंबीयांच्या शासकीय मदतीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन करत सकल मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या.
माझ्या पतीचे व आमच्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाता काम नये, अशी अपेक्षा देठे यांच्या पत्नी व मुलांनी यावेळी व्यक्त केली. आरक्षणाचा काहीच निर्णय होत नाही यामुळे खूपच हताश झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. मात्र हे चुकीचेच आहे, अशी भावनाही त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.