बारामती : श्री महावीर स्वामी दिगंबर जैन क्षेत्र दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) संस्थानाच्या लासुर्णे (ता. इंदापूर) येथील जमिनीवर परिसरातील पाच व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. याबाबत तीन महिन्यांपूर्वी तक्रार करूनदेखील वालचंदनगर पोलीस ठाण्याने कारवाई केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समिती व दहिगाव संस्थानने थेट मंत्रालयात धाव घेतली आहे. याबाबत अल्पसंख्याक विभागाचे मंत्री विनोद तावडे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान व अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निवेदन देऊन कारवाईची विनंती केली. या ठिकाणी देशभरातून जैन भाविक दर्शनासाठी येत असतात. लासुर्णे (ता. इंदापूर) येथील परीटवाडी परिसरात दहिगाव दिगंबर जैन संस्थानची गट क्रमांक १२६ मध्ये ८ हेक्टर ७० आर जमीन आहे. या जमिनीवर परिसरातील बजरंग भीमराव धनवडे, दत्तू बाबा ढवाण, बापू किसन पवार, अंबादास जगन्नाथ धनवडे, प्रकाश मारुती करनर (रा. परीटवाडी-लासुर्णे, ता. इंदापूर) या पाच व्यक्तींनी अतिक्रमण करून अल्पसंख्याक समाज संस्थेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समिती व दहिगाव संस्थानने थेट मंत्रालयात धाव घेऊन अल्पसंख्याकमंत्री विनोेद तावडे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निवेदन दिले. कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे आश्वासन मोहम्मद हुसेन खान यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कुलभूषण विभूते, दहिगाव संस्थानचे सचिव संजय दोशी, कोषाध्यक्ष अमृतलाल गांधी, राजेंद्र यवनकर, अशोक मोहिरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
दहिगाव संस्थानाची मंत्रालयात धाव
By admin | Published: December 22, 2016 1:46 AM