पुणे : राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक संस्थांचे प्रश्न चर्चा करून सुटावेत; या उद्देशाने राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने ‘मंत्रालय आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. येत्या १८ फेब्रुवारी रोजी पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासह शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी ११ वाजल्यापासून उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली विभागापासून सुरू केला. त्याच धरतीवर आता येत्या १८ फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठाशी संलग्न तीन जिल्ह्यांमधील शैक्षणिक प्रश्न सोडविले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रश्न सकाळी ११ ते २ या वेळेत, नाशिकचे प्रश्न २ ते ३ या कालावधीत आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रश्न ३.३० ते ५ या वेळेत सोडविण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने वेळ दिला आहे.
कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, सोलापूर व नांदेड विद्यापीठांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचे अंमलबजावणी केली त्याच प्रमाणे इतर विद्यापीठांतील या कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच प्राप्त होणारे अर्ज, प्रलंबित प्रस्ताव या बाबत उपसचिव किंवा संचालक यांनी तत्काळ कार्यवाही करून कार्यपूर्ती अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे सादर करावा. तसेच मंत्री, स्थानिक, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करावे, असे उच्च व तंत्रशिक्षण कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.