पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने बुधवारी आपला जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बालहक्क न्यायालयाने आता पूर्वीचा निर्णय बदलून नवे आदेश दिले.
न्यायालयात नेमकं काय घडलं?अपघातावेळी ते बाळ दारू प्यायले होते, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यशस्वी झाले. हे ‘बाळ’ दारूच्या नशेत होते, हे सांगण्यासाठी पुणे पोलिसांनी बाळानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेले ४८ हजार रुपयांचे बिल न्यायालयासमोर सादर केले. ज्यामध्ये या ‘बाळा’ने दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हे ‘बाळ’ दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आले.
कोणालाही पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री पुण्यात झालेल्या अपघातासंदर्भात मी स्वत: तेथील पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कायदेशीर, कठोर कारवाई केली जाईल; तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विशाल अग्रवालसह तिघांना पोलिस कोठडीअपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.