पिंपरी: आम्हाला घरात जाण्याकरता रस्ता राहणार नाही. तुम्ही चार फुटी रस्ता सोडून बांधकाम करा. असे समजावून सांगताना निर्माण झालेल्या किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरी गावच्या हद्दीतील मौजे इंद्रायणीनगर येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
रवींद्र कचरादास कुसळ (वय ३२, रा. इंद्रायणी नगर, ) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. अशोक चौधरी (वय ५५), अजित अशोक चौधरी (वय २७) तसेच एक ४७ वर्षीय महिला (सर्व रा. इंद्रायणी नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कुसळ यांच्या घराशेजारी राहतात. आरोपी त्यांच्या घराच्या बांधकामाकरिता कामाच्या तयारीत होते. या बांधकामामुळे आम्हाला घरात जाण्याकरता रस्ता राहणार नाही, म्हणून पूर्वी ठरलेला चारफुटी रस्ता सोडून बांधकाम कर, असे कुसळ त्यांना समजावून सांगत होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा हात खांद्यात निसटला. त्यांना दुखापत झाली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.