पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याबरोबर मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला माहेरी आणून सोडून तो निघून गेला. शेवटी या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अनुराग मनोज होळकर (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकीतील एका ३५ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अनुराग होळकर याने प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेबर २०२० मध्ये रेल्वेने अहमदनगर येथे पळवून नेले. तेथून एका गावात नेऊन तेथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केले. तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिला २३ जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी यांच्या घरी आणून सोडले.
त्यानंतर तो निघून गेला तो परत आला नाही. तो नेमका कोठे राहतो, याची काहीही माहिती फिर्यादी व तिच्या मुलीला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भाबड अधिक तपास करीत आहेत.