पुणे : सायंकाळची वेळ, शिवाजी रस्ता वाहनांनी भरुन वाहत होता़. त्याच गर्दीत एका रिक्षातून निवृत्त पोलीस अधिकारी चालले होते़. त्यांचे लक्ष चौकातून जात असलेल्या एका १७ वर्षाच्या मुलींकडे गेले़ ती घाबरलेली दित होती़. तिच्या मागोमाग एक वयस्कर पुरुष जाताना दिसत होता़. रिक्षातून जात असलेल्या या अधिकाऱ्याला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले़. रिक्षा पुढे गेली तरी, त्यांनी मागे वळून पाहिले तर ती मुलगी व तो पुरुष पुन्हा उलटे फिरले़. त्यांनी आपली शंका रिक्षाचालकाला बोलून दाखविली व ते बुधवार चौकात उतरले़. तोपर्यंत ती मुलगी व तो पुरुष अप्पा बळवंत चौकाकडे गेले व काही वेळाने पुन्हा बुधवार चौकातून पासोड्या विठोबा मंदिराकडे गेले़. या अधिकाऱ्यांच्या मनातील शंकेची जागा संशयाने घेतली़. त्यांनी चौकातील वाहतूक पोलिसाला बरोबर घेऊन त्यांना मंदिरापाशी गाठले़. त्या मुलीकडे विचारणा केल्यावर त्याला फसवून इथं आणले असल्याचे लक्षात आले़. त्यांनी दोघांना फरासखाना पोलिसांच्या स्वाधीन केले़. या अधिकाऱ्याच्या चाणाक्ष नजरेमुळे एक अल्पवयीन मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश आले़.. फरासखाना पोलिसांनी हरी कन्हैया बिजावत (वय ७२, रा़ हडपसर) याला अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्याशी लैगिंक चाळे केल्याच्या आरोपावरुन अटक केली़. शरद ओगले यांनी विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले असल्याने ते येथील परिस्थितीशी चांगले परिचित आहेत़. निवृत्तीनंतर ते काही कामासाठी फरासखाना वाहतूक विभागात येत होते़. त्यांना ती मुलगी घाबरलेली दिसल्याने त्यांनी दोघांना पोलिसांच्या हवाली केले़. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, या १७ वर्षाच्या मुलीला आईवडिल नाहीत़ .ती देहुरोडची राहणार असून तिच्या नातेवाईकांनी तिला पुणे स्टेशनला सोडून दिले होते़. ती रेल्वे तिकीट खिडकीपाशी थांबली असताना बिजावत याने तिला हेरले व तिच्याशी गोड गोड बोलून तुझ्या अंगावरचे कपडे खराब झाले आहेत़. चल तुला नवीन कपडे घेऊन देतो, असे सांगून तिला रिक्षाने शिवाजी रोडवर आणले़. रिक्षात त्याने तिच्याशी लगट करायचा प्रयत्न केल्याने ती घाबरली व मला जाऊ द्या असे म्हणून लागली़. तरी तो तिच्या मागे मागे जाऊन तु माझ्या घरी रहा असे सांगू लागला़. त्यांना पासोड्या विठोबा मंदिरापासून पोलीस ठाण्यात आणण्यात आले़. बिजावत याच्या तावडीतून या मुलीची सुटका करुन तिला बालसुधारगृहात ठेवले आहे़. बिजावत याला अटक करुन पुढील तपासासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी ही कारवाई केली़.
............
रिक्षातून जात असताना आपल्याला ही मुलगी घाबरलेली असल्याचे जाणवले़ तिच्या मागेमागे जाणाऱ्या माणसाविषयी संशय आल्याने बुधवार चौकातील वाहतूक पोलिसाला बरोबर घेऊन विठ्ठल मंदिराजवळ त्या मुलीकडे चौकशी केली़. तेव्हा तो तिला पुणे स्टेशनवरुन घेऊन आल्याचे तिने सांगितले़ त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना फरासखाना पोलिसांच्या हवाली केले़. शरद ओगले, सहायक पोलीस आयुक्त,निवृत्त