पुणे : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीच्या तपासातून ही बाब समोर आली. आरोपी नऱ्हे, सिंहगड, चाकण, सांगली, सातारा तसेच परराज्यांत पोलिसांना गुंगारा देऊन ठिकाणे बदलून पीडित मुलीसह राहत होता. अखेर नीरा येथे पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केला.
अभिषेक विकास रानवडे (वय २९, रा. ६२०/२१ नारायण पेठ) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे केली होती. विश्रामगबाग पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना आरोपी हा बारामती तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे आणि तपास पथकातील कर्मचारी बारामती येथे रवाना झाले. आरोपी मुरूम गावात असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो नीरा येथे लपून बसला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. ही कामगिरी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक गुन्हे कुंडलिक कायगुडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस उपनिरीक्षक खानविलकर, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तसेच पोलीस अंमलदार संजय दगडे, बाळासाहेब दांगडे, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.
--------------------