पुणे - देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण आहे, घटनेत सर्व धर्मांना समान न्याय आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली. राजकीय दबाव येणे हा कामाचाच भाग आहे. दबाव हा चांगला किंवा वाईट असतो. चांगल्या दबावाचा वापर योग्य रीतीने आपल्या कामात करता येऊ शकतो. त्यासाठी सद्सद्विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. युनिक अॅकॅडमी आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेला विद्यार्थी पीयूष साळुुंखे आदी उपस्थित होते.बोरवणकर म्हणाल्या, ‘‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी एकाग्रता, सातत्य आणि परिश्रमांची गरज असते. ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होता येईल असे नाही. मात्र, पालक सतत नकारात्मक विचार करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे पालकांचे समुपदेशन करण्याची जास्त गरज आहे.’’मला स्वत:ला एकेकाळी इंग्रजी बोलता येत नव्हते. इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड वाटायचा. अनेकदा हॅलो म्हणायचे की हाय म्हणायचे, हेही समजत नव्हते. मात्र, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर प्रत्येक उणीव दूर करता येते. विद्यार्थ्यांनी स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी एकाग्रता गरजेची आहे. सरकारी नोकरी म्हणजे आरामाचे काम नाही. या क्षेत्रात यायचे, तर पॅशन असली पाहिजे. निष्ठेने काहीतरी करायची इच्छाशक्ती असली पाहिजे. पगार, नोकरी, मान-सन्मानासाठी यूपीएससी नाही, असे बोरवणकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पीयूष साळुंखे याने मनोगत व्यक्त केले, तर तुकाराम जाधव यांनी प्रास्ताविक केले.
देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण, मीरा बोरवणकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 3:36 AM