इंदापूर : ‘‘लहानपणापासूनच आईने मला जे स्वप्न दाखवले, तेच स्वप्न मी उराशी बाळगून प्रयत्न करीत राहिलो. तिच्या स्वप्नांवर अफाट श्रद्धा ठेवली. त्यामुळे मी जिल्हाधिकारीपदावर झेप घेऊ शकलो. प्रत्येकाने आईच्या स्वप्नावर श्रद्धा ठेवली, तर आपल्यालाही निश्चित यश मिळेल,’’ असे मत महाराष्ट्र राज्याचे अपंगकल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांनी व्यक्त केले.
वरकुटे खुर्द येथील योगिराज वाचनालयातर्फे जी. के. जिनियस २०१९ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, पंचायत समिती सदस्या पुष्पा रेडके, युवा नेते महेंद्र रेडके, डॉ. शशिकांत तरंगे आदी उपस्थित होते. बालाजी मंजुळे म्हणाले, की प्रशासन, क्रीडा, राजकारण, शिक्षण इतर कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असताना काही जण सेवा हा शब्दच विसरतात. त्यामुळे त्यांना समाजाची सेवा करण्याचा अनेकदा विसर पडतो. पालक आपल्या मुलांना ज्या नजरेतून पाहतात, त्यांनी इतरांच्या मुलांनादेखील त्याच नजरेतून पाहावे. तर, समाजात खूप मोठा बदल होईल.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवणे गरजेचे आहे. कष्ट केल्याशिवाय जीवनात पर्याय नाही. योगिराज वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत शेंडे यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार फलफले यांनी सूत्रसंचालन केले. रमेश जाधव यांनी आभार मानले.