पुणे : पु्ण्यातील पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना पहिल्याच विस्तारात राज्यमंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या आहेत. यामुळे पुणे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार मिसाळ यांना राज्यमंत्रिपदी पहिल्यांदाच स्थान मिळाले असले तरी मात्र आता नेमके कोणते खातं मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण याेजनेच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देणारे सरकार, लाडक्या बहिणींनी निवडून दिलेले सरकार अशी काहीशी प्रतिमा सध्याच्या महायुतीच्या सरकारची आहे. साहजिकच मंत्रिमंडळातही ही प्रतिमा उमटवणे गरजेचे हाेते. कारण मागील मंत्रिमंडळात केवळ एकमेव महिला मंत्री हाेत्या. साहजिकच नवी ओळख निर्माण करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळात आ. मिसाळ यांचा समावेश झाले असल्याचे काही राजकीय विश्लेषक सांगतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पहिल्यापासून सक्रिय असलेल्या माधुरी मिसाळ पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक राहिल्या आहेत. पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या चिटणीसपदाचा त्यांनी काही काळ पदभार पाहिलेला आहे. २००७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर २००९ पासून त्या सलग चार टर्म पर्वती मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात अनेक बदल, आमिषे येऊनही त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या आणि पक्षाची भूमिका खंबीरपणे मांडत राहिल्या. साहजिकच त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल म्हणून ही मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याचे काहीजण सांगताना दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुणे महापालिका नगरसेविका ते सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघाची आमदार म्हणून काम केले. त्यामुळे आता केवळ पर्वती मतदारसंघाची आमदार नव्हे, तर महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून कार्य करताना माझी जबाबदारी वाढली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी अधिक लक्ष देऊन राज्याच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. -माधुरी मिसाळ, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य.