लसीकरण आवश्यकच : रोगप्रतिकारकशक्तीवर प्रतिसाद अवलंबून
डमी स्टार 1148
पुणे : कोणत्याही आजाराला प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते. विषाणूचा प्रवेश झाल्यावर शरीराकडून मिळणारा प्रतिसाद रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतो. लस टोचल्यानंतरही त्यातील मृत विषाणूविरोधात काहींचे शरीर जोरदार संघर्ष, तर काहींचे शांतपणे विरोध करते. त्यामुळेच ताप आला तरच लस प्रभावी ठरली, असे नसते. लसीकरणानंतर प्रत्येकाच्या आठवड्यात ७ ते १४ दिवसांमध्ये अँटिबॉडी विकसित होऊ लागतात. पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेतल्यावर होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
जिल्ह्यात जवळपास ६० लाख नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. लसीकरण झाल्यानंतर बहुतांश नागरिकांना ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. तर, काहींना मात्र लसीकरणानंतर कोणताही त्रास झालेला नाही. ताप न आल्यास लसीकरणाचा परिणाम होणार की नाही, याबाबत अनेक जण साशंक दिसत आहेत. लस घेतल्यानंतर त्रास होणे हे चांगले लक्षण आहे. लसीनंतर बहुतांश तरुणांना त्रास होतो. तुलनेने प्रौढ़, वयस्कर व्यक्तीचे शरीर मंद प्रतिसाद देत असल्याने अशांना त्रास कमी झाल्याचे दिसते. मात्र, त्रास झाला नाही म्हणजे लस प्रभावी ठरली नाही अशी काळजी करण्याचे कारण नाही, असे मत जनरल फिजिशियन डॉ. अरुण चव्हाण यांनी व्यक्त केले.
----
लस घेतल्यानंतर विषाणूविरोधात लढा सुरू होतो आणि त्यामुळे दाह (इंफ्लमेशन) होतो. याचाच परिणाम लक्षणांच्या स्वरूपात दिसतो. लस घेतल्यावर शरीरातील अण्डीबाँडीज वाढतात. या अण्डीबाँडीज कोरोना विषाणूंविरोधात लढतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते तेव्हा १३-१४ दिवसांनी त्याच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते. लस घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन या उपाययोजना आवश्यक आहेत.
- डॉ. अरुण मोहिते, जनरल फिजिशियन
----
आतापर्यंत झालेले लसीकरण - ८१,४०,१८१
पहिला डोस - ५९,०७,६५६
दोन्ही डोस - २२,३२,५२४
३) लसीनंतर काहीच झाले नाही...
पहिला डोस घेतल्यानंतर पत्नीला ताप, अंगदुखी असा त्रास झाला. भावाला आणि भावजयीलाही दोन दिवस कणकण होती. मला पहिल्या लसीनंतर दोन-तीन तास केवळ दंड दुखला, इतर काहीही त्रास झाला नाही. दुसऱ्या डोसनंतर तर मी लस घेऊन ऑफिसला गेलो. तेव्हाही त्रास झाला नाही. माझ्या ओळखीतील कोणालाच दुसऱ्या डोसनंतर त्रास झालेला नाही.
- मिहीर तोडकर