प्लास्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठी आहे का? प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक वापरले जाते का? प्लास्टिक सर्जरी फक्त त्वचारोग असणाऱ्या रुग्णांसाठी असते का, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात; पण प्लॉस्टिक सर्जरी ही श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत कोणीही करू शकतात; परंतु प्लास्टिक सर्जरी ही महागडी असल्याचे समजून अनेक लोक सर्जरी करून घेण्यास धास्तावतात. याचं मुख्य कारण प्लास्टिक सर्जरीबाबत लोकांमध्ये अनेक समज व गैरसमय आहेत. हे आता दूर करण्याची वेळ आली आहे.
प्लास्टिक सर्जरीमधील प्लास्टिक हा शब्द ग्रीक या भाषेतून आला आहे. प्लास्टिकोज या मूळ शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली आहे.
प्लास्टिक सर्जरी ही कुठल्याही एका अवयवाशी निगडित नाही. प्लास्टिक सर्जरी ही नखांपासून ते केसापर्यंत कोणत्याही बाह्य अवयवावर वापरता येते. केस प्रत्यारोपण, चेहऱ्याची कॉस्मेटिक सर्जरी या प्रकारच्या अँस्थेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त प्लास्टिक सर्जरी ही बऱ्याच आजारांना उपयुक्त असते. जसे की, चेहऱ्यावरच्या जखमा, हातावरील जखमा, मधुमेहामुळे पायावर झालेल्या जखमा (डायबेटिक फूट), जन्मतः असलेले व्यंग, भाजलेल्या जखमांवर उपचार, कर्करोगावरील उपचारामुळे आलेल्या शारीरिक विकृतीवर प्लास्टिक सर्जरीद्वारे उपचार करता येतात.
समज १) प्लास्टिक सर्जरी फक्त महिलांपुरती मर्यादित आहे?
तथ्य :- यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचं प्रमाण महिलांमध्ये अधिक असले तरी पुरुषही यात मागे नाहीत. मोठ्या संख्येने पुरुष लिपोसक्शन, राइनोप्लास्टी आणि अगदी गायनेकोमास्टिया शस्त्रक्रिया करून घेतात.
समज २) प्लास्टिक सर्जरी म्हणजे सौंदर्यासाठी केलेली शस्त्रक्रिया आहे?
तथ्य :- प्लास्टिक सर्जरी ही केवळ चेहरा सुंदर दिसावा यासाठी नव्हे, तर शरीरावरील भाजलेल्या जखमा, चेहऱ्यावरील फ्रॅक्चर दुरुस्त करण्यासाठी केली जाते. भारतात संपूर्ण चेहरा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नियमित होण्यासाठी एक किंवा दोन दशकांचा कालावधी लागेल. तूर्तास केस, कान, नाक, डोळे, टाळू, हनुवटी यामध्ये प्लास्टिक सर्जरी करून सुधारणा केली जाऊ शकते.
समज ३) प्लास्टिक शस्त्रक्रिया वेदनादायी आहे आणि रुग्णाला बरे होण्यास अधिक काळ लागतो.
तथ्य :- हे अजिबात खरे नाही. कारण, अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे प्लास्टिक सर्जरीनंतर रुग्णाचा बरे होण्याचा कालावधी कमी झाला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्यात येत असल्याने रुग्णाला वेदना जाणवत नाही. दोन ते तीन दिवसांत रुग्णाला घरी सोडण्यात येते. त्यानंतर रुग्ण दैनंदिन कामे करू शकतो.
समज ४) प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी सारखीच आहे?
तथ्य :- प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी एकच आहे, असा अनेक लोकांचा समज आहे; परंतु हे चुकीो आहे. बहुतांशी केल्या जाणाऱ्या प्लास्टिक सर्जरीज या कॉस्मेटिक सर्जरी नसतात. कॉस्मेटिक शस्त्रक्रिया एखाद्याचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते. कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची एक उपशाखा आहे. प्लास्टिक सर्जरीत अनेक उपशाखा आहेत जसे हाताची प्लास्टिक सर्जरी (हँड सर्जरी). यात हाताच्या विविध व्यंगावरच्या शस्त्रक्रिया होतात.
समज ५) प्लास्टिक सर्जरी ही फक्त श्रीमंत लोकांसाठीच बनलेली आहे.
तथ्य :- बहुतांश प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्यांना परवडणारीच असते. प्लास्टिक सर्जरी करून घेणारे लोक हे सर्वसामान्यच आहेत. कदाचित प्लास्टिक सर्जरीच्या नावाशी प्रसिद्धीचे वलय जोडले गेल्याने प्लास्टिक सर्जरी अतिशय महागडी आहे, असे लोक समजतात.
समज ६) प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीज अतिशय धोकादायक असतात.
तथ्य :- इतर कुठल्याही शस्त्रक्रियांप्रमाणेच किंवा तितकीच जोखीम ही प्लास्टिक सर्जरी करतानाही असतेच. त्यात अतिरिक्त जोखीम नाही.