कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय? तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दांत कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशादेखील पिकला.
----------
माळेगाव, छत्रपती साखर कारखान्याच्या
अध्यक्षांना कानपिचक्या...
‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सह्याद्री सहकारी साखर कारखाना देशात अव्वल ठरला आहे. त्यांच्याकडे सध्या २० लाख साखर पोत्यांचा साठा आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे विचार करा या कारखान्याला किती फायदा होणार आहे. आपल्या तिन्ही साखर कारखान्याचे चेअरमन यांनी पाहा जरा कारखान्याचे काम कशापद्धतीने केले जाते. सहकारमंत्र्यांचा कारखाना एकखांबी आहे. ते म्हणतील ती पूर्वदिशा असते. कारखान्याची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली जाते. ते सांगतिल तो संचालक होतो. मात्र, आपल्याकडे माळेगाव व सोमेश्वरमध्ये सगळा गोंधळच आहे. माळेगावचे अध्यक्ष बाळासाहे तावरे तर अगदी मेटाकुटीला आले आहेत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व छत्रपती अध्यक्ष प्रशांत काटे यांना कानपिचक्या दिल्या. यावर मात्र कार्यक्रमस्थळी चांगलीच खसखस पिकली.
----------
...तेव्हा सहकारमंत्र्यांच्या बंडखोरीला आम्ही पाठिंबा दिला
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधानसभेचे तिकीट एका निवडणुकीमध्ये पक्षाने कापले. त्या वेळी बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही सुद्धा त्यांना ‘करा’ असे म्हणत आम्ही देखील बाळासाहेब पाटील यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिला. त्यानंतर बाळासाहेब ४३ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले. विजयी झाले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बाळासाहेब दैवत मानत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. यावर देखील जोरदार हशा पिकला.
------------------------------