राजगुरुनगर (पुणे): राजगुरुनगर बाजारपेठ परिसरात सोमवारी (दि. ११) सायंकाळी ६:३० वाजता ३ वर्षाचा एक छोटा मुलगा ( मिराज जावेद ) बेवारसपणे फिरताना आढळून आल्यावर काही अनोळखी व्यक्तींनी त्या छोट्या मुलाला पोलीस ठाण्यात सोडवले. त्या मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न खेड पोलिसांनी सुरू केला. त्या मुलाच्या घरच्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी शेवटी पोलिस व्हॅनमधे त्या छोट्या मुलाला घेऊन संपूर्ण राजगुरुनगर शहरात व आजुबाजूला त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पोलिस व्हॅनवरील स्पिकरच्या माध्यमातून माईकवरुन त्या मुलाविषयी माहिती पुकारत होते. सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही शोधमोहिम सुरु होती. मात्र नातेवाईक मिळून आले नाही.
राजगुरुनगरमधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी पोलिसांना मदत म्हणून त्या मुलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. शहरातील माणिक होरे, बापू नगरकर व अनेक सामाजिक संघटना यांनी देखील सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली. फेसबुकवर त्या मुलाविषयी पोस्ट केली. भोसरी पोलीस ठाण्यात वरुन आज मंगळवारी (दि. १२) सकाळी सहायक पोलिस निरिक्षक काशीनाथ बुढे यांचा फोन कैलास दुधाळे यांना आला. फेसबुकवरील पोस्टचा संदर्भ देत सांगितले की, तुम्ही फेसबुकवर जी पोस्ट केलेली आहे त्या मुलाचे आई वडील भोसरी पोलिस स्टेशन येथे मुलगा हरविल्याची नोंद करायला आले आहेत. खेड पोलिस पोलिस हवालदार सागर शिंगाडे यांनी त्या मुलाच्या आई वडीलांना खेड पोलीस स्टेशनला बोलावून घेतले त्या मुलाच्या आईचे नाव रोशन जावेद वडीलांचे नाव महम्मद जावेद रा. भोसरी, भगतवस्ती बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळ हा मुलगा राजगुरुनगरला कसा आला हे मात्र काहीच समजू शकले नाही.
रितसर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्या मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले. मुलाला ताब्यात घेतल्यावर आई वडीलांचा आनंद गगनात मावत नव्हता तर राजगुरुनगरमधे आजही माणुसकी जिवंत आहे असे चित्र दिसून येत होते. या शोध मोहिमेत पोलिस निरिक्षक सतिश गुरव, महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षा राणी घाटे पोलिस सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार संतोष घोलप, शेखर भोईर, संदिप भापकर, सागर शिंगाडे वाहनचालक रेफाळे व होमगार्ड सावंत सामील होते.